पदवीधर शिक्षक , शिडवणे नं. १

Wednesday, October 31, 2018

आदर्श शिक्षकाबद्दल माझ्या मनातील कल्पना लहानपणी जर कोणालाही असा प्रश्न विचारला कि तू मोठेपणी कोण होणार आहेस तर १ ली पासून ७ वी पर्यंतची मुले पूर्वी एकच उत्तर देत असत . मी मोठेपणी शिक्षक किंवा शिक्षिका होणार. १ ली त असताना मला माझ्या पप्पांनी हाच प्रश्न विचारला होता असे मला माझे पप्पा आता सांगतात . तेव्हा मी त्यांना असेच उत्तर दिले होते कि मी ना १ ली ची बाई होणार. या गोष्टीला आता १० वर्षे म्हणजे एक दशक उलटून गेले तरी मी आज सुद्धा त्याच उत्तराशी ठाम आहे. पहिल्यांदा आईचा पदर सोडल्यानंतर दुसरा पदर शिक्षिकेचाच धरला जातो.मग त्या शिक्षकांशी जे नातं जुळतं ते कायमचंच. म्हणूनच शिक्षकांबद्दल मला अपर आदर वाटत आलेला आहे आणि तो कायमच तसा राहील यात तिळमात्र शंका नाही. शिक्षक म्हणजे शीलवान, क्षमाशील, कलाकार व्यक्तिमत्त्व. माझे शिक्षक मला कधी आई वाटले, कधी बाबांची भूमिका बजावणारे वाटले, तर कधी मित्राप्रमाणे सुखदुःखातसाथ देणारे लाभले. माझ्या मनात आदर्श शिक्षकाविषयी अनेक कल्पना आहेत. आताच्या नवीन युगात तर शिक्षकाने खूपच जबाबदारीने वागण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण बाकी कोणाहीकडून समाज कोणतीही अपेक्षा ठेवत नाही पण शिक्षकांकडून मात्र भरपूर अपेक्षा बाळगून आहे. पूर्वीच्या शिक्षकांमध्ये आणि आताच्या शिक्षकांमध्ये बराच फरक झाला आहे हे नाकारून चालणार नाही. तरीही प्रवाहाबरोबर शिक्षकही बदलणे क्रमप्राप्त होते आणि ते झालेही. शिक्षक हा पेशा होता. आता तो एक व्यवसाय झाला आहे. शिक्षक हा हाडाचा असावा लागतो असे म्हटले जाई. पण नंतर तो प्रशिक्षण देवून घडवता येऊ लागला. एक किंवा दोन वर्षाचे प्रशिक्षण देऊन शिक्षकाची पदवी प्राप्त करता येईल पण म्हणून त्याच्यात आदर्श शिक्षकाचे गुण येतील असे नक्कीच सांगता येणार नाही. कारण मुळातच शिक्षक हा आजन्म विद्यार्थीच असावा लागतो नव्हे त्याने तसे असायलाच हवे. शिक्षकाने काळाप्रमाणे बदलत असताना आपल्यामध्येही अभ्यासपूर्वक बदल घडवणे गरजेचे आहे. आपल्यामधील त्रुटी कमी करत नवनवीन तंत्रज्ञान शिकून घेत अखंड विद्यार्थी असल्याबाबत नित्यनुतन टवटवीत राहायला हवे. नाहीतर नेहमी तेच तेच शिकवत राहू, तसेच शिकवत राहू तर मुले त्या शिक्षकांकडे कशी बरं आकर्षिली जातील ? म्हणूनच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात कि शिक्षक हा नेहमी अध्ययनशील असायला हवाच. कारण पणती स्वतः पेटत असल्याशिवाय दुसऱ्या पणतीला प्रज्ज्वलित करू शकत नाही. माझ्या मनातील शिक्षक दररोज अभ्यास करूनच वर्गावर जाईल. तो चालू घडामोडी समजून घेण्यासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी वर्तमानपत्रांचे निवडक वाचन करील. विद्यार्थी उद्या आपल्याला कोणता प्रश्न विचारेल सांगता येत नाही, त्यामुळे त्या अनुषंगाने येणाऱ्या बाबींवर नजर घालणे त्याच्यासाठी उपयोगाचे ठरणार आहे. माझ्या मनातील शिक्षक असे वाचन करीलच, पण त्यावर चिंतन करून काय बरोबर हे अचूकपणे मुलांना सांगेल. कारण नाण्याच्या दोन बाजू असतात. चांगली बाजू उचलून धरून वाईट बाजू दुर्लक्षित करण्यासाठी प्रवृत्त करेल. त्याचबरोबर सर्व प्रकारचे साहित्य वाचन करण्याची त्याची आवड तो जोपासत राहील. वाचनात कधीही खंड पडू देणार नाही. दरमहा एक तरी नवीन पुस्तक काह्रेडी करून आपल्या वैयक्तिकग्रंथालयामध्ये भर घालत राहील. मुलांनाही कोणती पुस्तके वाचावीत याबाबत मार्गदर्शन करील. बोलता बोलता पुस्तकांचा, लेखक, कवी यांचा संदर्भ देईल. वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून नेहमी पर्यावरणाचे संरक्षण होईल या दृष्टीने प्रयत्न करील. शिक्षक बसून शिकवणार नाही. तो नेहमी वर्गात फिरत फिरत सर्वांवर नजर ठेवत शिकवेल. तो शिकवताना पाठ्यघटकामध्ये आपलं सर्वस्व ओतण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. त्याचे हावभाव, हालचाल बोलकी असेल. त्याने केलेला आवाजातील बदल घटकाला अनुसरून असेल. आवाजातील चढ-उतार याचा परिणाम वर्गातील संपादणूकीवर होतो हे त्याला चांगलेच माहित असेल. विद्यार्थ्यांमधील दोष न पाहता त्याच्यातील गुण पाहून ते वाढण्यासाठी तो प्रयत्नशील राहील. शिष्याला तो शिक्षा करणार नाही तर चूक काय ते नीट समजून सांगेल. सतत विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून तो स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. त्याला माहित असेल कि तो जे काही करतोय त्याने पिढी घडेल कि बिघडेल ते. पिढी अधिक उच्चस्तराकडे जाण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. शैक्षणिक साहित्याचा वापर करताना मानसशास्त्र जाणून घेऊन मगच त्याचा वापर करेल. तो एक बालमानसशास्त्रज्ञ असेल. संशोधक असेल. अभिनेता असेल. गायक असेल. उत्तम लेखक असेल. तंत्रस्नेही असेल. समीक्षक असेल. तपासनीस असेल. वर्गात हसतमुखाने शिकवणारा , प्रयोगातून समजावून देणारा प्रयोगशील शिक्षक असेल. मुलांमध्ये भारताचा भावी आदर्श नागरिक पाहणारा असेल. मुलांच्या मनात त्याच्याबद्दल भीती न वाटता प्रेम वाटेल व आईबाबांपेक्षाही अधिक सुरक्षित वाटण्याइतका निरागस ,निर्मळ, चारित्र्यसंपन्न असेल. असा माझ्या मनातील शिक्षक असला खराखुरा तर आजच्या पिढीचे होणार नाही कधी कुपोषण, शोषण. कारण अश्या शिक्षकाच्या हाताखाली जे विद्यार्थी घडतील ते त्याच्यासारखेच आदर्श असतील. चला तर मग वाटचाल करूया त्या युगाची ज्या युगात असा आदर्श शिक्षक असेल आणि असा आदर्श समाज घडेल. गुरूने दिला ज्ञानरूपी वसा ...आम्ही चालवू हा पुढे वारसा.


मांगवली नं. १ शाळेत विहानचा वाढदिवस उत्साहात साजरा मांगवली : दिनांक २९ : वि. मं. मांगवली नं.१ मध्ये शनिवार दिनांक २९ रोजी शाळेच्या शिवाजी महाराज सभागृहामध्ये “ विहान अजय राव “ याचा वाढदिवस अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. गेली सलग चार वर्षे “ विहान अजय राव “ या मुलाचा वाढदिवस त्याचे पालक सौ.मनीषा अजय राव आणि श्री. अजय गोपाल राव यांच्या सौजन्याने मांगवली शाळेत साजरा केला जातो. याही वर्षी विहानचा वाढदिवस मोठ्या उत्साहवर्धक रीतीने साजरा करण्यात आला. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती मा.शारदा कांबळे,वैभववाडी पंचायत समितीचे सभापती मा.लक्ष्मण रावराणे, वैभववाडीचे गटविकास अधिकारी मा.जयप्रकाश परब, केंद्रप्रमुख केळकरसर, सरपंच राजेंद्र राणे, विहानचे आजोबा श्री.चंद्रकांत रत्नू राणे, कोकण विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.श्रीधर राणे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र कोलते ,मधुकर भुर्के माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पाटीलसर,माजी सरपंच श्री.महेश संसारे,मुख्याध्यापक श्री.गजानन अडूळकरसर इ. उपस्थित होते. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सन २०१७-१८ मधील उच्चस्तर गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम अनुक्रमे ५००,३००,२०० रु. व प्रत्येकी एक इंग्रजी शब्दकोश देवून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी विहानला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. मुलांनी स्वत: बनविलेली शुभेच्छा पत्रे विहानसाठी दिली. सर्वांनी मिळून विहानला उत्तम आयु आरोग्य लाभो अशी देवाकडे प्रार्थना केली. केक कापून टाळ्यांच्या गजरात विहानला मुलांनी वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शाळेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते विहानला आकर्षक असे स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच शाळेतील सम्राट सुरेश पाटील व रुही दीपक पवार या मुलांचेही वाढदिवस साजरे करण्यात आले. चंद्रकांत राणे व सरिता राणे यांनी सर्व मुलांना विहानच्या वतीने भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. शाळेचे माजी उपशिक्षक श्री. सुनील रमेश घुगरे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवर व उपस्थितांनी या कार्यक्रमानंतरच्या स्नेहभोजनाचा लाभ घेतला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विवेकानंद कडूसर यांनी केले. प्रवीण कुबल यांनी उपस्थितांचे आभार मानले.सदर कार्यक्रमाला गावातील अनेक ग्रामस्थ,पालक,प्रतिष्ठीत व्यक्ती,शिक्षक वर्ग उपस्थित होते.


नमस्ते शारदादेवी , वीणा पुस्तक धारिणी , विद्यारंभ करीस्यामी प्रसन्ना भव्य सर्वदा


यंदाच्या शारदोत्सवात मांगवली नं. १ च्या मुलांनी स्वतः शारदा पूजन केले. भजने म्हटली. त्या दिवशी ए. पी. जे. अब्दुलकलाम यांचा जन्मदिन ' वाचन प्रेरणा दिन ' म्हणून साजरा करताना सर्व मुलांचे वैयक्तिक समारंभपूर्वक वाचन घेतले.





















श्री. अतिश कांबळे सर यांनी ' तिथवली व वेंगसर अंतर्गत झालेल्या शिक्षण परिषदेत इ. १ लीच्या मराठी पुस्तकाचे परिक्षण केले.


सरदार वल्लभभाईपटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी . चित्रकला स्पर्धा..घोषवाक्ये स्पर्धा..





















विहान अजय राव याच्या वाढदिवसानिमित्त मुलांनी त्याच्यासाठी बनवलेली शुभेच्छा पत्रे.



शारदोत्सव jallosh


राष्ट्रीय एकता दिवस व राष्ट्रीय संकल्प दिवस ३१ ऑक्टोबर २०१८


आज मांगवली नं.१ शाळेत ' सरदार वल्लभभाई पटेल ' यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस या नावाने साजरी करण्यात आली. तसेच ' इंदिरा गांधी ' याची पुण्यतिथी ' राष्ट्रीय संकल्प दिन' म्हणून साजरी करण्यात आली. त्यावेळी शाळेच्या मुलांनी प्रतिमापूजन केले. पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर श्री. प्रवीण कुबल सर यांनी दोन्ही नेत्यांबद्दल माहिती सांगितली. दोन्ही दिवसांचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले. दुपारनंतर मुलांनी घोषवाक्ये स्पर्धेत सहभाग घेतला. ५ वी, ६ वी, ७ वी च्या मुलांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. त्यावेळी त्यांनी सुंदर सुंदर चित्रे काढून ती छान रंगात रंगविली. दररोज २ तास सुट्टीमध्ये अभ्यास करण्याचा संकल्प केला. विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होता आल्याने सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सदर उपक्रमासाठी सौ. कांबळे यांचेही सहकार्य लाभले. इ. १ ली ते ३ री च्या मुलांनी विविध प्रकारची गाणी म्हणून आनंद साजरा केला. शाळेच्या भगतसिंग स्काऊट पथकामधील १३ मुलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

🛑 कुप्पमातले दिस लय भारी

🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार  त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार  झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...