पदवीधर शिक्षक , शिडवणे नं. १

Showing posts with label निबंधमाला. Show all posts
Showing posts with label निबंधमाला. Show all posts

Thursday, December 6, 2018

आमचे अडुळकरसर

आमचे अडूळकरसर
    मी ३१ मार्च २०१२ रोजी मांगवली नं. १ शाळेत हजर झालो. तेव्हा शाळेत एकूण ९२ मुले होती. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अडूळकरसर , कडूसर, बावडेकरसर, घुगरेसर, सतीश चव्हाणसर असे आम्ही एकूण ६ शिक्षक होतो. शाळेचे मुख्याध्यापक अडूळकरसर अगदी साधे , पण त्यांच्याबद्दल आमच्या मनात कमालीचा आदर निर्माण झाला. गेली ६ वर्षे ९ महिने त्यांच्यासोबत काम करत असताना खूप काही शिकता आले. त्यांनी आम्हाला कधीही आदेश दिला नाही. आमच्या मनाला लागेल असे कधी बोलले नाहीत. आपल्याला जेवढे जमेल तसे काम करत असताना आपण करून दाखवत आमच्याकडून काम करून घेतले. सतत हसतमुख चेहऱ्याने काम कसे करावे ते मी त्यांच्याकडूनच शिकलो.
    त्यांनी मला कधी दुखावण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा जेव्हा मी प्रॉब्लेममध्ये येईन असे त्यांना वाटले की ते मला त्या गोष्टीची कल्पना देऊन सावध करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असे. त्यांनी संपूर्ण जबाबदारी स्वीकारून शाळेचे मुख्याध्यापकपद अगदी काळजीपूर्वक भूषविले. कोणालाही उलट बोलून आपले मोठेपण सिद्ध करण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. परिपाठापासून संध्याकाळच्या वंदे मातरम् पर्यंत सर्व उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी होत त्यांनी मुख्याध्यापकपदाची शान कायम ठेवली.
    शांतपणाने येणाऱ्या समस्यांना तोंड देण्याची पद्धत त्यांची नेहमीची सवय बनली होती. त्यांनी नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना नावानिशी हाक मारली. आपली जबाबदारी दुसऱ्याकडे देताना त्यांनी आदेश न देता विनंतीच केली. सर्वांशी नेहमी आदरपूर्वक वागणे आणि कोणालाही न दुखावणे ही त्यांची हातोटी होती. त्यांच्यासोबत शैक्षणिक उपक्रमांना मिळालेली साथ अत्यंत मोलाची अशीच होती.
आमच्या कौटुंबिक कार्यक्रमानाही त्यांनी बऱ्याचदा हजेरी लावून नातेसंबंध दृढ करण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वीदेखील ठरले.कधी कधी आम्हा शिक्षकांनाही ज्येष्ठ शिक्षकांचे मार्गदर्शन हवे असते, ते मार्गदर्शन आम्हाला अडूळकरसरांकडूनच लाभले. छोट्या शाळेतून कामाची सुरुवात असल्याने व एकशिक्षकी शाळेत अनेक वर्षे काम केल्यामुळे प्रशासकीय कामाचा उरक त्यांच्याइतका मला कुठेही बघायला मिळाला नाही. आर्थिक बाबींमधील पारदर्शकता वाखाणण्यासारखी होती. मी सर्व उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी त्यांची असलेली तळमळ मला स्पष्ट दिसत होती. माझ्या दैनंदिन कामात कोणताही व्यत्यय येऊ नये याची ते जाणीवपूर्वक काळजी घेत. मी न करू शकलेली कामे ते कोणतीही कुरकुर न करता करत. त्यामुळे मलाच लाज वाटून मला पुढच्यावेळी ती कामे करण्यासाठी प्रयत्न करावे लागत. अशा प्रकारे तावून सुलाखून गेल्याने मला अधिक चांगलेपणाने काम करण्यासाठी घडवण्यात त्यांचा बराच वाटा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
रजा हवी असली की लगेच मंजूर करून मला जाण्याची परवानगी देत असत. स्वतः रजेवर जाताना आम्हाला आधी कल्पना देऊन सर्व कामांचे नियोजन सांगूनच जात असत. आर्थिक कामांचा हिशेब लगेचच करून स्वतःच्या खिश्यातील पदरमोड करण्याची त्यांची सवय आम्ही विसरू शकणार नाही. प्रत्येक कार्यक्रम नियोजनपूर्वक होण्यासाठी त्यांची धडपड त्यांच्या चेहऱ्यावर दिसे. येत असलेले दडपण त्यांनी आम्हाला कधी दाखवले नाही.आमचे चुकले तरी आमच्या चुका पोटात घालण्याची त्यांची सवय आम्हाला माहित होती. आमच्याकडून चुका झाल्या तरी त्याची जबाबदारी ते मुख्याध्यापक म्हणून स्वतः स्वीकारत असत.
शाळेला कोणत्याही अधिकाऱ्याची भेट होणार असेल तर त्यांची तयारी सुरु होई. बारीक बारीक तपशीलवार माहितीचे संकलन करून त्यांनी आलेल्या अधिकाऱ्यांचे समाधान करताना मी स्वतः पाहिलेले आहे. आम्हाला आता त्यांची इतकी सवय झाली आहे की दुसरे मुख्याध्यापक स्वीकारताना मला तर खूपच त्रास होईल. आज मुख्याध्यापक म्हणून काम पाहताना त्यांनी दिलेली शिकवण लक्षात ठेवूनच मला पुढील वाटचाल करावी लागेल. कार्यमुक्त होऊनही क्रीडास्पर्धेतील त्यांचे वावरणे नेहमीसारखेच दिसले. आमच्या शाळेला यापुढे अनेक मुख्याध्यापक येतीलही पण अडूळकरसरांची सर त्यांना नक्कीच येणार नाही. असे आमचे अडूळकरसर आमच्या शाळेतून बदली झाल्यानंतर त्यांची उणीव आम्हाला कायम भेडसावत राहणार आहे.
आमच्या अडूळकरसरांना मंगेश्वर देवाच्या कृपेने दिर्घायु लाभो अशी प्रार्थना करतो.
 
लेखन : प्रवीण कुबलसर , पदवीधर शिक्षक , मांगवली नं. १

Thursday, November 1, 2018

बळीराजासाठी एक दिवस सन २०१८

बळीराजासाठी एक दिवस        बळीराजा म्हणजे आपला शेतकरी. शेतात काम करून , घाम गाळून मोत्याचे दाणे पिकवणारा अन्नदाता.आम्ही लहान असताना शाळा सुरु झाली कि पाऊस सुरु होत असे आणि पावसातून भिजत जातानाचा आनंद काय वर्णावा ! शेतामधून वाट काढत काढत शाळेकडे जाताना त्या अन्नदात्याचे साक्षात दर्शन घडे.मस्त आनंदात जात असताना त्या शेतकऱ्याबद्दल कमालीचा आदर वाटत असे. पण आज मात्र चित्र बदललेले दिसते. शेतीबद्दल मुलांच्या मनात अनास्था दिसून येऊ लागली आहे. पूर्वी आम्हाला पावसाची लावणीसाठी १५ दिवसांची सुट्टी असे. त्यावेळी आमच्या शेतीत काम करताना, घाम गाळताना भान हरपून जात असे. पण आताच्या मुलांना ती संधी मिळेनाशी झाली आहे. बरेचसे पालक आपल्या मुलांना घेऊन शहराकडे रवाना झाले आहेत. शेती टाकून पैसे मिळवण्यासाठी मुंबईसारख्या शहरात स्थायिक होऊ लागले आहेत. अर्थातच त्याचे आपल्या गावाकडे येणेही खूप अंशी कमी झाले आहे.पर्यायाने मुलांना शेतीविषयी प्रेम वाटणेही कमी होत चालले आहे.       यावर काही प्रमाणात मात करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सन २०१८ या वर्षी “ बळीराजासाठी एक दिवस “ हि संकल्पना आणली. शाळेतील शिक्षकांनी मुलांना घेऊन शाळेच्या जवळच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष शेतीकामाचा अनुभव घेण्याचे ठरवले. आम्ही हि संकल्पना आमच्या शालेय व्यवस्थापन समितीसमोर मांडली. समितीमधील बहुतांश सदस्य शेतकरी असल्यामुळे त्यांना ही संकल्पना खूप आवडली. त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात राबवायचे मान्य केले.       आदल्या दिवशी मुख्याध्यापक श्री. अडूळकरसर यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधला व पूर्वकल्पना दिली. शेतकरी लगेचच प्रात्यक्षिक दाखवण्यास तयार झाले. दुसरा दिवस उजाडला. तो शनिवारचा दिवस होता. शाळा सकाळची होती. मुले सकाळी लवकरच शाळेत दाखल झाली. कधी एकदा शेतात जातो असे प्रत्येकाला झाले होते. सर्वांनी शेतात घालायचे साधे वेश परिधान करून आले होते. सकाळची वेळ असूनही सर्व मुले शेतात काम करण्यासाठी आतुर झाली होती. सर्व शिक्षकांनी मुलांना ओळीमध्ये उभे केले. जय जवान, जय किसान असे नारे देत देत मुले शेताकडे रवाना झाली. जाता जाता वाटेतील झाडेझुडपे पाहत पाहत रमत गमत मुले बांधावरून चालू लागली होती. जातानाची वाट ही जंगलातून होती.वाटेत दिसणाऱ्या विविध झाडांची नावे जाणून घेत घेत वानरसेना पुढे पुढे निघाली. जंगली वनस्पतींची नावे समजून घेताना एक वेगळाच अनामिक आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता. औषधी वनस्पती , रानभाज्या, रानवेली, पालेभाज्या, पक्षी, पाळीव प्राणी, रानातील प्राणी  इ. चा प्रत्यक्ष अनुभव घेताना सर्व मुले मनापासून बोलकी होत होती.       सर्व शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी साहेब आपल्या शाळेतील मुलांना घेऊन शेताकडे चालले आहेत हे चित्रच खूप आनंद देणारे होते. सर्व पालकांना शाळेचा खूप अभिमान वाटत होताच, पण या दृश्यामुळे तो अधिक वृद्धिंगत होताना दिसत होता. शाळेत न येणारे ग्रामस्थही आपणहून चौकशी करायला पुढे सरसावले. या अभियानाचा एक हिस्साच होऊन गेले ते त्यांचे त्यांनाच कळले नाही. आणि एकदाची मुले शेताल दाखल झाली.       शेतात जाताच मुलांनी आपणहून ओळी मोडून टाकल्या. आपल्या काका, बाबा, आजोबा, काकी, आई, भाऊ, बहिणीसोबत काम करायला उत्सुक झाली. पटपट कामे करायला सुरुवात झाली. मुलींनी तरवा काढायला सुरुवात केली. बघता बघता १०-१२ पेंढ्या कडून मोकळी झाली. आपले शेतीमित्र जसे करतील तसे करण्याचा व शिकण्याचा जाणीवपूर्वक प्रयास करू लागली. शिक्षक, अधिकारी यांनीही कामाला हातभार लावला. आलेले पालक काम समजून देत होते. जीव सांभाळून काम करण्याविषयी सूचना देत होते. नांगरणी करण्यासाठी मुलगे पुढे झाले. होता होता एका मळ्याचा चिखल कधी झाला ते कळले सूद्धा नाही. नांगर, रुमणी, गुटा, फाळ, जगाल, इश्याड, जू इ. नावे समजून घेऊन स्वत: वापरूनही पाहिली. मजा आली हे सर्व अनुभवताना सर्वांनाच. त्यानंतर लावणी सुरु झाली. त्याच वेळी वरूणराजाने बरसायला सुरुवात केली. मुले अधिक आनंदाने पावसात भिजत कामे पूर्ण करू लागली.घरी कधीच कामे न करणारी मुले कामे करताना पाहून त्यांच्या पालकांनाही आश्चर्य वाटले. मुलांना शेतकऱ्यांच्याबद्दल वाटणारा आदर अधिक वाढला. त्याच्या कामाविषयी गोडी वाढलेली दिसली. शेतीचे काम कमी दर्जाचे नसून ते जीवन देणारे आहे हे सर्व मुलांना समजले होते. शेतीच्या व शेतकऱ्यांच्या कामाविषयीची श्रमप्रतिष्ठा पुस्तकामधून शिकवण्यापेक्षा खूप कमी वेळात हे मूल्य मुलांच्यात रुजवता आल्याचा आनंद सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अश्याप्रकारे आमच्या मांगवली नं. १ शाळेने राबवलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने सार्थकी लागला.       लेखन : श्री. प्रवीण अशितोष कुबल.           पदवीधर प्राथमिक शिक्षक,          वि. मं. मांगवली नं. १ , ता. वैभववाडी.          जिल्हा : सिंधुदुर्ग.             

🛑 कुप्पमातले दिस लय भारी

🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार  त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार  झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...