आमचे अडूळकरसर
मी ३१ मार्च २०१२ रोजी मांगवली नं. १ शाळेत हजर झालो. तेव्हा शाळेत एकूण ९२ मुले होती. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अडूळकरसर , कडूसर, बावडेकरसर, घुगरेसर, सतीश चव्हाणसर असे आम्ही एकूण ६ शिक्षक होतो. शाळेचे मुख्याध्यापक अडूळकरसर अगदी साधे , पण त्यांच्याबद्दल आमच्या मनात कमालीचा आदर निर्माण झाला. गेली ६ वर्षे ९ महिने त्यांच्यासोबत काम करत असताना खूप काही शिकता आले. त्यांनी आम्हाला कधीही आदेश दिला नाही. आमच्या मनाला लागेल असे कधी बोलले नाहीत. आपल्याला जेवढे जमेल तसे काम करत असताना आपण करून दाखवत आमच्याकडून काम करून घेतले. सतत हसतमुख चेहऱ्याने काम कसे करावे ते मी त्यांच्याकडूनच शिकलो.
त्यांनी मला कधी दुखावण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा जेव्हा मी प्रॉब्लेममध्ये येईन असे त्यांना वाटले की ते मला त्या गोष्टीची कल्पना देऊन सावध करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असे. त्यांनी संपूर्ण जबाबदारी स्वीकारून शाळेचे मुख्याध्यापकपद अगदी काळजीपूर्वक भूषविले. कोणालाही उलट बोलून आपले मोठेपण सिद्ध करण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. परिपाठापासून संध्याकाळच्या वंदे मातरम् पर्यंत सर्व उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी होत त्यांनी मुख्याध्यापकपदाची शान कायम ठेवली.
शांतपणाने येणाऱ्या समस्यांना तोंड देण्याची पद्धत त्यांची नेहमीची सवय बनली होती. त्यांनी नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना नावानिशी हाक मारली. आपली जबाबदारी दुसऱ्याकडे देताना त्यांनी आदेश न देता विनंतीच केली. सर्वांशी नेहमी आदरपूर्वक वागणे आणि कोणालाही न दुखावणे ही त्यांची हातोटी होती. त्यांच्यासोबत शैक्षणिक उपक्रमांना मिळालेली साथ अत्यंत मोलाची अशीच होती.
आमच्या कौटुंबिक कार्यक्रमानाही त्यांनी बऱ्याचदा हजेरी लावून नातेसंबंध दृढ करण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वीदेखील ठरले.कधी कधी आम्हा शिक्षकांनाही ज्येष्ठ शिक्षकांचे मार्गदर्शन हवे असते, ते मार्गदर्शन आम्हाला अडूळकरसरांकडूनच लाभले. छोट्या शाळेतून कामाची सुरुवात असल्याने व एकशिक्षकी शाळेत अनेक वर्षे काम केल्यामुळे प्रशासकीय कामाचा उरक त्यांच्याइतका मला कुठेही बघायला मिळाला नाही. आर्थिक बाबींमधील पारदर्शकता वाखाणण्यासारखी होती. मी सर्व उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी त्यांची असलेली तळमळ मला स्पष्ट दिसत होती. माझ्या दैनंदिन कामात कोणताही व्यत्यय येऊ नये याची ते जाणीवपूर्वक काळजी घेत. मी न करू शकलेली कामे ते कोणतीही कुरकुर न करता करत. त्यामुळे मलाच लाज वाटून मला पुढच्यावेळी ती कामे करण्यासाठी प्रयत्न करावे लागत. अशा प्रकारे तावून सुलाखून गेल्याने मला अधिक चांगलेपणाने काम करण्यासाठी घडवण्यात त्यांचा बराच वाटा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
रजा हवी असली की लगेच मंजूर करून मला जाण्याची परवानगी देत असत. स्वतः रजेवर जाताना आम्हाला आधी कल्पना देऊन सर्व कामांचे नियोजन सांगूनच जात असत. आर्थिक कामांचा हिशेब लगेचच करून स्वतःच्या खिश्यातील पदरमोड करण्याची त्यांची सवय आम्ही विसरू शकणार नाही. प्रत्येक कार्यक्रम नियोजनपूर्वक होण्यासाठी त्यांची धडपड त्यांच्या चेहऱ्यावर दिसे. येत असलेले दडपण त्यांनी आम्हाला कधी दाखवले नाही.आमचे चुकले तरी आमच्या चुका पोटात घालण्याची त्यांची सवय आम्हाला माहित होती. आमच्याकडून चुका झाल्या तरी त्याची जबाबदारी ते मुख्याध्यापक म्हणून स्वतः स्वीकारत असत.
शाळेला कोणत्याही अधिकाऱ्याची भेट होणार असेल तर त्यांची तयारी सुरु होई. बारीक बारीक तपशीलवार माहितीचे संकलन करून त्यांनी आलेल्या अधिकाऱ्यांचे समाधान करताना मी स्वतः पाहिलेले आहे. आम्हाला आता त्यांची इतकी सवय झाली आहे की दुसरे मुख्याध्यापक स्वीकारताना मला तर खूपच त्रास होईल. आज मुख्याध्यापक म्हणून काम पाहताना त्यांनी दिलेली शिकवण लक्षात ठेवूनच मला पुढील वाटचाल करावी लागेल. कार्यमुक्त होऊनही क्रीडास्पर्धेतील त्यांचे वावरणे नेहमीसारखेच दिसले. आमच्या शाळेला यापुढे अनेक मुख्याध्यापक येतीलही पण अडूळकरसरांची सर त्यांना नक्कीच येणार नाही. असे आमचे अडूळकरसर आमच्या शाळेतून बदली झाल्यानंतर त्यांची उणीव आम्हाला कायम भेडसावत राहणार आहे.
आमच्या अडूळकरसरांना मंगेश्वर देवाच्या कृपेने दिर्घायु लाभो अशी प्रार्थना करतो.
लेखन : प्रवीण कुबलसर , पदवीधर शिक्षक , मांगवली नं. १
No comments:
Post a Comment