पदवीधर शिक्षक , शिडवणे नं. १

Wednesday, July 3, 2019

मी ज्या शाळेत शिकलो ती कणकवली नं . ३ शाळा

               कणकवली शहरातील भालचंद्र आश्रमाजवळ असलेली शाळा . कणकवली नं .३ शाळेचे नामकरण भालचंद्र महाराज आश्रमावरूनच ' भालचंद्र महाराज विद्यालय कणकवली ' असे नाव आमच्या शाळेला मिळाले. मी त्या शाळेत १९८१ साली दाखल झालो. बाबांनी सगळ्यांना गूळ , खोबरे दिले. कारण त्यांचा मोठा मुलगा शाळेची पायरी चढत होता. काही समजत नव्हते मला त्यावेळी शाळा म्हणजे काय ते. कारण त्यावेळी आतासारखी बालवाडी , शिशुवर्ग नव्हते. एकदम पहिलीत जावे लागत असे. पहिलीच्या बाई बघूनच शाळेत जायचे कि नाही ते ठरत असे. आम्हाला पंडित नावाच्या बाई होत्या. त्या खूप चांगल्या होत्या. त्यांचे प्रेमळ बोल आम्हाला आपलेसे करीत असत. त्यांच्याविषयी आम्हाला कमालीचा आदर वाटे. त्या सांगतील तसे  मी करण्याचा प्रयत्न करीत असे. पण त्या ज्या दिवशी रजेवर असत त्यावेळी आमची म्हणजे माझी गोची होऊन जाई .मग तावडे बाई आमच्या वर्गाला आपल्या वर्गात बसण्यास सांगत. त्यांची मला भीती वाटत असे. मग काय ....बाईंची नजर चुकवून मी बऱ्याचदा वर्गातून पोबारा करीत असे. आमच्या बाबांचे सलून होते. ते शाळेपासून जवळच होते. त्यामुळे मी सरळ दुकानात जाऊन  बसे.
               बाबा मला विचारत कि  ' शाळा सुटली नाही तरी कसा आलास ? ' मग मी खरे ते सांगून टाके. बाईंना घाबरून मी दुकानात आलो, मला खाऊला पैसे द्या. मग माझी दुकानापासून शाळेतील तावडे बाईंच्या वर्गापर्यंत वाजत गाजत वरात निघे. कारण कडक स्वभावाचे माझे बाबा मला ओल्या काठीने मारत नेत . मी त्यांच्या पाया  पडत असे आणि मला मारू नका मी शाळेत जातो असे सांगत धावतच शाळेत रडत रडत दाखल होत असे. त्यामुळे रडणाऱ्या मला तावडेबाई  पुन्हा ओरडतही नसत. त्यानंतर एक दोनदा असे घडल्यानंतर मी शाळेत नियमित जाऊ लागलो. माझी शाळेविषयीची भीती कमी कमी होत गेली. मुख्याध्यापक रॉड्रिग्ज गुरुजी होते. त्यांच्याजवळ मला छान वास येई. पण त्यांच्याजवळ जायला मला भीती वाटे. ते मला जवळ घेत. हळूहळू त्यांचीही भीती कमी होत गेली. बाबानी आमच्या शिक्षणासाठी आम्ही मागू तेव्हा पैसे देऊ शकले नाहीत, तरीही दोन दिवसात प्रयत्न करतो असे सांगून पैसे  देत. पैसे थेट त्यांच्याकडे न मागता आम्ही आईकडे मध्यस्थी करत असू. ताई किंवा आका यांच्यामार्फत सुद्धा  मी आणि माझा  पैसे किंवा इतर आवश्यक वस्तू मागत असू. वस्तू मिळायला वेळ लागे , पण वस्तू मिळण्याची खात्री असे. हवी असलेली  वस्तू महाग असली तर मिळण्याची शक्यता कमी असे. श्रीमंतांच्या मुलांनी आणलेल्या वस्तू आम्हाला हव्या असत तर मात्र त्या आम्हाला मिळण्याची मारामार असे. मग माझी मोठी बहीण ताई आम्हाला म्हणे, ' बाळांनु , आपण अश्या वस्तू वापरायच्या नसतात . आम्ही गरीब आहोत. ' खूप वाईट वाटायचे त्यावेळी . खूप त्रास व्हायचा. पण  आता आम्ही आमच्या मुलांना महागड्या वस्तू देताना अजिबात विचार करत नाही, मागण्याच्या अगोदरच वस्तू हातात आणून देत असतो. आम्हाला मिळाल्या नाहीत , म्हणून आमच्या मुलांना त्या वस्तू मिळाव्यात हा  निर्मळ हेतू असतो आमचा. पण त्यावेळी एखादी वस्तू मिळण्याची वाट बघण्यातही एक वेगळाच आनंद लपलेला असे....आता तो आनंद मिळत नाही हेच खरे.  

🛑 कुप्पमातले दिस लय भारी

🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार  त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार  झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...