चिरा चिरा हा घडवावा , कळस किर्तीचा चढवावा अज्ञानी तो पढवावा , थेंब आम्ही तर सागर हे.....
Wednesday, October 31, 2018
आदर्श शिक्षकाबद्दल माझ्या मनातील कल्पना लहानपणी जर कोणालाही असा प्रश्न विचारला कि तू मोठेपणी कोण होणार आहेस तर १ ली पासून ७ वी पर्यंतची मुले पूर्वी एकच उत्तर देत असत . मी मोठेपणी शिक्षक किंवा शिक्षिका होणार. १ ली त असताना मला माझ्या पप्पांनी हाच प्रश्न विचारला होता असे मला माझे पप्पा आता सांगतात . तेव्हा मी त्यांना असेच उत्तर दिले होते कि मी ना १ ली ची बाई होणार. या गोष्टीला आता १० वर्षे म्हणजे एक दशक उलटून गेले तरी मी आज सुद्धा त्याच उत्तराशी ठाम आहे. पहिल्यांदा आईचा पदर सोडल्यानंतर दुसरा पदर शिक्षिकेचाच धरला जातो.मग त्या शिक्षकांशी जे नातं जुळतं ते कायमचंच. म्हणूनच शिक्षकांबद्दल मला अपर आदर वाटत आलेला आहे आणि तो कायमच तसा राहील यात तिळमात्र शंका नाही. शिक्षक म्हणजे शीलवान, क्षमाशील, कलाकार व्यक्तिमत्त्व. माझे शिक्षक मला कधी आई वाटले, कधी बाबांची भूमिका बजावणारे वाटले, तर कधी मित्राप्रमाणे सुखदुःखातसाथ देणारे लाभले. माझ्या मनात आदर्श शिक्षकाविषयी अनेक कल्पना आहेत. आताच्या नवीन युगात तर शिक्षकाने खूपच जबाबदारीने वागण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण बाकी कोणाहीकडून समाज कोणतीही अपेक्षा ठेवत नाही पण शिक्षकांकडून मात्र भरपूर अपेक्षा बाळगून आहे. पूर्वीच्या शिक्षकांमध्ये आणि आताच्या शिक्षकांमध्ये बराच फरक झाला आहे हे नाकारून चालणार नाही. तरीही प्रवाहाबरोबर शिक्षकही बदलणे क्रमप्राप्त होते आणि ते झालेही. शिक्षक हा पेशा होता. आता तो एक व्यवसाय झाला आहे. शिक्षक हा हाडाचा असावा लागतो असे म्हटले जाई. पण नंतर तो प्रशिक्षण देवून घडवता येऊ लागला. एक किंवा दोन वर्षाचे प्रशिक्षण देऊन शिक्षकाची पदवी प्राप्त करता येईल पण म्हणून त्याच्यात आदर्श शिक्षकाचे गुण येतील असे नक्कीच सांगता येणार नाही. कारण मुळातच शिक्षक हा आजन्म विद्यार्थीच असावा लागतो नव्हे त्याने तसे असायलाच हवे. शिक्षकाने काळाप्रमाणे बदलत असताना आपल्यामध्येही अभ्यासपूर्वक बदल घडवणे गरजेचे आहे. आपल्यामधील त्रुटी कमी करत नवनवीन तंत्रज्ञान शिकून घेत अखंड विद्यार्थी असल्याबाबत नित्यनुतन टवटवीत राहायला हवे. नाहीतर नेहमी तेच तेच शिकवत राहू, तसेच शिकवत राहू तर मुले त्या शिक्षकांकडे कशी बरं आकर्षिली जातील ? म्हणूनच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात कि शिक्षक हा नेहमी अध्ययनशील असायला हवाच. कारण पणती स्वतः पेटत असल्याशिवाय दुसऱ्या पणतीला प्रज्ज्वलित करू शकत नाही. माझ्या मनातील शिक्षक दररोज अभ्यास करूनच वर्गावर जाईल. तो चालू घडामोडी समजून घेण्यासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी वर्तमानपत्रांचे निवडक वाचन करील. विद्यार्थी उद्या आपल्याला कोणता प्रश्न विचारेल सांगता येत नाही, त्यामुळे त्या अनुषंगाने येणाऱ्या बाबींवर नजर घालणे त्याच्यासाठी उपयोगाचे ठरणार आहे. माझ्या मनातील शिक्षक असे वाचन करीलच, पण त्यावर चिंतन करून काय बरोबर हे अचूकपणे मुलांना सांगेल. कारण नाण्याच्या दोन बाजू असतात. चांगली बाजू उचलून धरून वाईट बाजू दुर्लक्षित करण्यासाठी प्रवृत्त करेल. त्याचबरोबर सर्व प्रकारचे साहित्य वाचन करण्याची त्याची आवड तो जोपासत राहील. वाचनात कधीही खंड पडू देणार नाही. दरमहा एक तरी नवीन पुस्तक काह्रेडी करून आपल्या वैयक्तिकग्रंथालयामध्ये भर घालत राहील. मुलांनाही कोणती पुस्तके वाचावीत याबाबत मार्गदर्शन करील. बोलता बोलता पुस्तकांचा, लेखक, कवी यांचा संदर्भ देईल. वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून नेहमी पर्यावरणाचे संरक्षण होईल या दृष्टीने प्रयत्न करील. शिक्षक बसून शिकवणार नाही. तो नेहमी वर्गात फिरत फिरत सर्वांवर नजर ठेवत शिकवेल. तो शिकवताना पाठ्यघटकामध्ये आपलं सर्वस्व ओतण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. त्याचे हावभाव, हालचाल बोलकी असेल. त्याने केलेला आवाजातील बदल घटकाला अनुसरून असेल. आवाजातील चढ-उतार याचा परिणाम वर्गातील संपादणूकीवर होतो हे त्याला चांगलेच माहित असेल. विद्यार्थ्यांमधील दोष न पाहता त्याच्यातील गुण पाहून ते वाढण्यासाठी तो प्रयत्नशील राहील. शिष्याला तो शिक्षा करणार नाही तर चूक काय ते नीट समजून सांगेल. सतत विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून तो स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. त्याला माहित असेल कि तो जे काही करतोय त्याने पिढी घडेल कि बिघडेल ते. पिढी अधिक उच्चस्तराकडे जाण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. शैक्षणिक साहित्याचा वापर करताना मानसशास्त्र जाणून घेऊन मगच त्याचा वापर करेल. तो एक बालमानसशास्त्रज्ञ असेल. संशोधक असेल. अभिनेता असेल. गायक असेल. उत्तम लेखक असेल. तंत्रस्नेही असेल. समीक्षक असेल. तपासनीस असेल. वर्गात हसतमुखाने शिकवणारा , प्रयोगातून समजावून देणारा प्रयोगशील शिक्षक असेल. मुलांमध्ये भारताचा भावी आदर्श नागरिक पाहणारा असेल. मुलांच्या मनात त्याच्याबद्दल भीती न वाटता प्रेम वाटेल व आईबाबांपेक्षाही अधिक सुरक्षित वाटण्याइतका निरागस ,निर्मळ, चारित्र्यसंपन्न असेल. असा माझ्या मनातील शिक्षक असला खराखुरा तर आजच्या पिढीचे होणार नाही कधी कुपोषण, शोषण. कारण अश्या शिक्षकाच्या हाताखाली जे विद्यार्थी घडतील ते त्याच्यासारखेच आदर्श असतील. चला तर मग वाटचाल करूया त्या युगाची ज्या युगात असा आदर्श शिक्षक असेल आणि असा आदर्श समाज घडेल. गुरूने दिला ज्ञानरूपी वसा ...आम्ही चालवू हा पुढे वारसा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
🛑 कुप्पमातले दिस लय भारी
🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...
-
ज्ञानी मी होणार - मोठा गट - पुष्प ४ थे १ ) ' मी फुल तृणातील इवले ' या कवितेचे कवी को...
-
Khup chan lekh 👌
ReplyDelete