पदवीधर शिक्षक , शिडवणे नं. १

Thursday, November 1, 2018

माझा गाव , स्वच्छ गाव माझा गाव आहे मांगवली. माझा गाव मला खूप आवडतो.मांगवली गाव म्हणजे एक प्रकारे विकासाचेच नाव आहे. गावात जाल तेथे तुम्हाला“ स्वच्छतेच्या घरी” आल्यासारखे वाटत राहील. स्वच्छता आमच्या गावातील प्रत्येकाच्या अंगांगात भिनली आहे. ती आता आमच्यासाठी जणू सेवाच बनली आहे. स्वच्छतेचे हे व्रत, हा वसा जपत जपतच मांगवलीतील प्रत्येक ग्रामस्थ आपला गाव स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्नशील असतो. गावात जी सार्वजनिक ठिकाणे आहेत त्यामध्ये मंगेश्वर मंदिर, रवळनाथ मंदिर, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी येथे गेलात तर तुम्ही म्हणाल कि खरंच या गावातील लोक किती सामाजिक स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देवून स्वच्छता पाळतात ते. शालेय इमारती सुशोभित तर आहेतच , परंतु दरवर्षी आमच्या गावाला किंवा शाळेला स्वच्छतेचा एक तरी पुरस्कार मिळतोच मिळतो. आमच्या गावातील मांगवली नं. १ शाळेला सानेगुरुजी स्वच्छ शाळा स्पर्धेमध्ये “ स्वच्छ शाळा “ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रत्येकजण स्वच्छतादूत बनून गावात स्वच्छतेसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. सर्व शाळांमधील विद्यार्थी स्वच्छतादूत बनून प्रत्येकाच्या घरी जावून स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट करताना दिसत आहेत. गावाचा कानाकोपरा स्वच्छतेने उजळून गेलेला दिसतोय. स्वच्छता कमिटीचे सर्व सदस्य तपासणीला येतात तेव्हा अगदी खुश होऊन गावाची तोंड भरून प्रशंसा करताना दिसतात. ग्रामपंचायतीचे स्वछतेसाठीचे योगदान मोलाचे आहे. विविध स्वच्छताविषयक उपक्रम राबवून लोकांना स्वच्छता ही एक सवय असल्याचे गावच्या पदाधिकाऱ्यांनी अगदी सोप्या पद्धतीने पटवून दिले आहे. दर आठवड्याला पाण्याच्या टाकीची काळजीपूर्वक स्वच्छता केली जाते. त्यात आठवणीने TCL पावडर टाकून पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया राबवली जाते. सर्व लोकांना स्वच्छ व शुद्ध पाणी देण्याचे महत्वाचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अखंडपणे सुरु आहे. या गोष्टीकडे गावाच्या अधिकाऱ्यांचे व पदाधिकाऱ्यांचे डोळ्यात तेल घालून लक्ष असते हि एक उल्लेखनीय बाब आहे. त्यामुळे गावात रोगराई पसरत नाही. रोगराई पसरण्यापुर्वीच त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्यसेविका महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. शाळेतील सर्व मुले स्वच्छतेचे संदेश आचरणात आणतात. पाणी पिताना नेहमी ओगराल्याचा वापर करतात. आमच्या गावाला हल्लीच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. के.मंजुलक्ष्मीयांनी भेट दिली. त्यांनी मांगवली ग्रामपंचायतीला डिजिटल ग्रामपंचायत म्हणून घोषित केले हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.आणि म्हणूनच आमच्या गावात येणारा प्रत्येकजण गावात येताच खुश होऊन जातो.असा आमचा स्वच्छ , सुंदर मांगवली गाव.


No comments:

Post a Comment

🛑 कुप्पमातले दिस लय भारी

🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार  त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार  झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...